पुनश्च भरारी (Target achived)
पुनश्च भरारी (Target achived)
ट्रिंग ट्रिंग...
ट्रिंग ट्रिंग...
.....
फोनची रिंग वाजतच होती.
सुमती ने फोन उचलला.
"हॅलो.. कोण ?"
पलीकडून आवाज आला. "मॅडम पुन्हा एकदा धन्यवाद "
सुमतीला आवाज ओळखीचा वाटत होता पण नाव पटकन नाही आठवले.
" कोण बोलत आहे ? कळेल का ?"
" मी सावंत "
सुमतीला आठवले.
" अच्छा अच्छा... बोला . पटकन नाव आठवलेच नाही ह. बोला"
" आज पुन्हा एकदा तुम्ही सांगितलेला फॉर्म्युला वापरला आणि मी जिंकलो. खूप खूप धन्यवाद .. खरे तर धन्यवाद हा शब्द खूप छोटा आहे. "
" या शेअर वर मी आधी ही पैसे गुंतवले होते पण..... पण आज मी खुशीत आहे. तुमचे आभार मानण्यासाठी फोन केला. "
सुमती हलकेच हसली. " अभिनंदन"
आणि तिने फोन ठेवला.
सुमती सोफ्यावर बसली आणि मागे डोके टेकून शांत शांत बसली. चार वाजत होते. सगळ्यांना घरी यायला अजुन अवकाश होता. रोजच्या व्यापाने तिला ही शीण आलाच होता. डोळे बंद केले आणि तिला ते सर्व आठवले.
ती रात्र ... तिचा वेडेपणा (?) खरेच कसे झाले असे सगळे ?
सात वर्षापूर्वीची ती घटना.
संध्याकाळचे पाच वाजले होते. तिने स्कुटी फाटकातून आत घेतली. स्टँडवर लावताना तिची तिलाच थरथर जाणवली. कुलूप उघडून ती आत आली. दार लावून क्षणभर दारालाच टेकली आणि मग बेडरूम मध्ये जावून स्वतःला झोकून दिले. खूप रडू येत होते.
पर्स मधून पुन्हा ते कागद काढून तिने पाहिले. आणि ते आकडे बघता बघता तिचे डोळे भरून आले. कसे होणार आता हा एकच प्रश्न तिला सतावत होता.
गेले आठवडाभर तिने हे सुहास पासून लपवले होते. लहानातली लहान गोष्ट ही त्याला सांगणारी सुमती या वेळेस गप्प होती. सांगावे तर लागणारच होते पण कसे सांगावे हा मोठा प्रश्न तिच्यापुढे होता.
मेधा आणि किरण साडेसहा पर्यंत घरी येतात. सुहास सात वाजता. तिने मनाशी काहीतरी ठरविले सर्व कागद पुन्हा पर्स मध्ये ठेवले. कपाट उघडले. सर्व बकांची पुस्तके आणि पॉलीसिज बाहेर काढल्या. आकडेमोड सुरू केली. पुन्हा पुन्हा करत होती आणि डोळे भरून येत होते.
नाही नाही. नाही जमत आहे तेवढी रक्कम. एलआयसी ची पॉलिसी आहे एक लाखाची. त्याचे बऱ्यापैकी हफ्ते भरून झाले आहेत. मॅचुरिटीला वेळ आहे. पण ठीक आहे. थोडे दागिने आहेत. जर सगळे मोडले तर रक्कम नक्कीच जमा होईल. पण पुन्हा दागिने करणे शक्य नाही.
काय करू ??? काय करू. ???
"जर मीच राहिले नाही तर ...??????""
एक लाखाची पॉलिसी... त्याचे दोन ते अडीच लाख येतील. तेच पैसे सुहास ला भरायला सांगावे म्हणजे त्याला त्रास नको.
खरेच.... आता जगणे नकोच. या एकाच विचाराने तिला ग्रासून टाकले. पुन्हा पुन्हा पॉलिसीज पहिल्या. आणि तिने निर्णय घेतला. सर्व आवरून ठेवले.
स्वयंपाक घरात जावून तिने स्वतःसाठी चहा करून घेतला. पुन्हा पुन्हा तिची नजर पर्स कडे जात होती आणि ते कागद डोळ्यापुढे दिसत होते.
फक्त आठ दिवस. क्लेम चे पैसे चार दिवसात मिळतात असे ऐकले होते. पण मृत्यू नैसर्गिक हवा.
कसा ?????
हार्ट अटॅक ही चालतो. हं.... नाही... काही सुचत नाही . काय करू ?? विचाराने तिचे डोके नुसते भणाणून गेले होते.
साडेसहा वाजले. मुले घरी आली. ती तिच्याच विचारत होती. तिने मुलांना दूध दिले. मुलांनी एक घोट घेतला आणि त्यांना कळेना. आज आईने नुसतेच दूध दिले. त्यात साखर नाही काही नाही आणि बरोबर बिस्किटे पण नाही.
मेधा म्हणाली... " आई ! अग दुधात साखर घालायची राहिली की "
" तूच घालून घे. आता सगळे तुमचे तुम्हालाच करावे लागेल."
मेधाला कळेचना आई असे का म्हणाली. असेल तिला काही काम काही दिवस असा विचार करून तीही किरण पाठोपाठ खेळायला निघून गेली.
पावणेसात ला सुहासचा फोन आला. यायला थोडा उशीर होईल. तिने बरं म्हणून फोन ठेवला.
रात्रीच्या स्वयंपाकाच्या तयारीला लागली. विचार बाजूला सारून तिने मन लावून सगळा स्वयंपाक केला. तिघांच्या आवडीची भाजी कोशिंबीर पापड तळून तिने कणीक भिजवून ठेवली. तिघांना ही गरम पोळ्या आवडतात. आज त्या ही खाऊ घालायच्या.
सगळे तिने तिला हवे तसे केले.
नऊ वाजले. मागचे सर्व आवरून ती हॉल मध्ये येवून बसली. मुले पेंगुळली होती. त्यांना झोपा आता असे सांगून ती शांत बसली.
सांगावे का सुहास ला सारे ??? नकोच... पण कसे होईल या तिघांचे मी नसेन तर ?? पण आता दुसरा पर्याय ही नाही.
ती कधी आणि कशी शेअर बाजारात एवढी गुंतली तिचे तिलाच कळले नाही. तसे ही या जगाशी ओळख होऊन जेमतेम सहा महिने झाले होते.
अकाउंट ओपन करताना सुहास ने सांगितले होते " सांभाळून कर. तुझ्याकडे जर शंभर रुपये असतील तर त्यातील दहा किंवा वीस रुपयेच गुंतव. म्हणजे नुकसान झाले तरी तुला वाईट वाटणार नाही. कारण हे नुकसान आपण सहन करू शकतो.
तिने सुरुवातीला ऐकले. पण हळू हळू नशा चढत गेली. आणि शंभराचे हजार... हजाराचे दहा हजार आणि लाख कधी झाले तिलाच कळले नाही. सुरुवातीला फायदा मिळत गेला. तिने तो ही गुंतवायला सुरुवात केली. आणि कुठे काय चुकले कळलेच नाही. सगळे उलटेच झाले. नुकसान झाले. ठीक आहे. पुन्हा करू या विचाराने तिने दुसऱ्या दिवशी डबल सट्टा केला पण तो ही दिवस तिचा नव्हता. दिवसामागून दिवस आणि आठवडा झाला आणि..... आणि तिच्या हातात ते पेपर आले. थोडा अंदाज होता. नुकसान झाले याचा. पण एवढे ???
एका आठवड्यात दोन लाख ????
आणि ही रक्कम भरण्याची मुदत होती पुढचा फक्त एक आठवडा.
रात्रीचे साडेदहा वाजले. ती उठली. मुले गाढ झोपली होती. तिने त्यांना पाहिले. तिचे डोळे भरून येत होते. नाही. आता मागे फिरायचे नाही. सुहास ही झोपायच्या तयारीत होता.
"काय गं... आज गप्प गप्प. " त्याने विचारले.
" आज काय मार्केट ला गेली नाहीस की काय ?"
ती काहीच बोलली नाही. काय सांगू या विचारात गढली.
नेहमी बडबड करणारी आपली प्रियतमा आज गप्प हे सुहास ला ही जरा वेगळेच वाटले.
त्याने निरखून पाहिले. तिच्या मनाची चलबिचल तिच्या चेहऱ्यावर उमटली होती.
" नुकसान झाले का आज ? होऊ दे. थोडे पुढे मागे होणारच. एवढे काय मनावर घेतेस ?? मी आहे ना ?? "
त्याचे तिला धीर देणे सुरू झाले. ती काहीच बोलली नाही. तिथून उठली आणि कपाट उघडून तिने विम्याची कागदपत्रे त्याच्यासमोर ठेवली आणि म्हणाली..
" खरे तर यातून मिळणारी रक्कम मला तुझ्यासाठी आणि मुलांसाठी खर्च करायची होती. पण..... आता ही रक्कम मी माझ्यासाठीच वापरणार."
सुहास : " अगं !! तुझेच पैसे आहेत. तूच हफ्ते भरते आहेस. या साठी मी कधी ही तुला वेगळे पैसे दिले नाहीत. पण ते पैसे मिळायला अजुन अवकाश आहे ना ??"
एवढे बोलून सुहास झोपला. सुमतीला मात्र झोप येईना. ते सगळे कागद आणि पर्स घेवून ती हॉल मध्ये आली. पुन्हा आकडेमोड. दोन लाख.... एवढे जमा व्हायलाच हवे. आणि त्यासाठी मला मरायलाच हवे हा तिचा विचार दृढ होत गेला.
सुहास ची झोप चाळवली. कोण रडत आहे ?
"सुमे". त्याने हाक मारली. पण उत्तर नाही. ही तर इथे नाही. कुठे गेली ?
तो उठला. दार उघडले तर हॉल मध्ये दिवा लागलेला दिसला. कोण आहे हॉल मध्ये ? एवढ्या रात्री कोणाचे काय सुरू आहे ?
त्याने पाहिले तर सुमती चेहऱ्यावर हात ठेवून हमसाहमशी रडत होती. सारे शरीर गदगदत होते. त्याला तिची ही केविलवाणी अवस्था बघवेना. हळूच तिच्या जवळ बसला. समोर समोर पॉलिसी पेपर आणि अजुन ही काही पेपर .. उघडी पर्स.. त्याला काहीच समजेना. त्याने हळूच तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला आवाज दिला " सुमा"
ती दचकली आणि एकदम रडायची थांबली आणि क्षणात सुहासच्या मिठीत शिरली.
सुहास तिला थोपटत राहिला. ती हळुहळु शांत झाली आणि मनाचा धीर करून तिने सुहास ला सगळे सांगण्याचा निर्णय घेतला.
तिने सांगायला सुरुवात करता करता .. एक एक शब्द ऐकता ऐकता त्याचा पारा चढत गेला.
" तरी मी तुला सुरुवातीलाच सावध केले होते... बजावले होते ." तो म्हणाला.
" पण मी काय करू ??? मला नाही समजले. मी इतरांच्या सांगण्याप्रमाणे करत गेले. सगळ्यांना फायदा झाला आणि माझेच का एवढे नुकसान ??? मला नाही काही कळत ."
ती रडतच होती. हळूहळू सुहास शांत होत गेला. आणि त्याने विचार करायला सुरुवात केली.
सुरुवातीला त्याला सुमतीचा जेवढा राग आला होता त्याहीपेक्षा जास्त आता तिची कणव आली. ही आपली सावली. थोडी भरकटली. आता तिला आपणच आधार द्यायला हवा. तो उठला. पाणी घेवून आला. तिला प्यायला दिले. शांत केले.
" बघू मला सगळी बिले .."
"पाहिले बिल कोणते ??."
" हं... ठीक आहे.. येथे तुला दहा हजाराचा तोटा झाला. "
" बघू पुढचे... "
तिने त्याला पुढचे बिल दिले.
" बापरे.... परत तेवढंच ??? "
" दुसऱ्या दिवशी ही तू तेच केलेस.. येथेच थांबली असतीस तर ??"
आणि पुढची बिले बघताच तो सुन्न झाला.
" आणि हे काय ...?? या दोन दिवशी मिळून पंचेचाळीस हजार ????? "
सुमती : " अहो.. मला हेच कळत नाही. या दोन्ही दिवशी मी तुमच्याबरोबर होते. मी गेलेच नव्हते तरी ही बिले माझ्या नावावर कशी ??"
"मी विचारले.. भांडले तर त्यांनी मला माझी सही दाखवली बिल मिळाल्याची .
बिल मिळाले की आम्ही जिथे सही करतो तिथे."
" मी चुकले सुहास.... मला नाही जगायचे आता. मी खूप नुकसान केले आहे. तुम्ही विम्याच्या पैशातून हे पैसे भरा . मला नाही जगायचे आता ."
सुहास ने तिला पुन्हा शांत केले. सर्व बिले एकत्र केली. जमाखर्च सगळे नीट मांडले. व्यवस्थित बघितले.
सर्व नीट पाहिल्यावर सुहास म्हणाला .. " या सर्व बिलांवरून तुला दोन लाख त्यांना द्यायचे आहेत तर तुझ्या म्हणण्यानुसार एक लाख पंचावन्न हजार द्यायचे आहेत ते ही एका आठवड्यात. बरोबर ??"
सुमती ने फक्त मान हलवली .
सुहास चे डोके भणभणू लागले. १०/१२ तास ऑफिस मध्ये काम करायचे तेही महिनाभर तेव्हा कुठे हातात पंचवीस एक हजार येतात आणि इथे काही तासात सुमतीने हे पैसे घालवले.
बँकेची पुस्तके तिथेच होती. मी एक सामान्य माणूस. घरखर्च आणि गाडीचा हफ्ता जावून किती शिल्लक टाकणार ? एवढी शिल्लक नाही आहे. काहीतरी तोडगा हा काढावा लागणारच. काही ही करून सुमतीला यातून बाहेर काढायलाच हवे.
त्याने तिला जवळ घेतले आणि म्हणाला.." असे जीव देवून प्रश्न सुटत नसतात. वेडे तू सगळ्यांना हवी आहेस. जे झाले ते झाले. मी आहे तुझ्याबरोबर. काढू आपण यातून मार्ग.फक्त कोणताही वेडेपणा तू करायचा नाहीस "
दुसऱ्या दिवशी त्याने ऑफिस मधून सुट्टी घेतली आणि सकाळी दहा वाजता तिच्याबरोबर ती जिथे हे व्यवहार करीत असे तिथे गेला.
तेथील मुख्य कोण याची चौकशी केली आणि त्यांनाच भेटायचे आहे हे सांगितले.
त्यांच्या केबिन मध्ये दोघेही गेले. सुमतीला तर साहेब ओळखत होतेच.
" या मॅडम ... आज काहीच केले नाही अजुन ?? "
तिचा चेहरा उतरला. निग्रहाने डोळ्यातील परतवून लावले. "हे माझे मिस्टर. यांना तुमच्याशी बोलायचे आहे. "
आणि सुहास कडे वळून तिने ओळख करून दिली. " हे देसाई सर ."
देसाई सर : " हो का. . ?? बसा बसा.."
सुहास बसला आणि म्हणाला.
" सरळ मुद्द्यावरच येतो. तुम्ही ही firm चालवता पण जर कोणी चुकत असेल तर थांबवत का नाही ? आणि ती व्यक्ती जर एखाद्या दिवशी न येताही त्या व्यक्तीच्या नावावर व्यवहार कसे होतात ?"
देसाई सर : " आम्ही असे कोणाला थांबवू शकत नाही. त्यांचे पैसे असतात. बोललो तर त्यांना राग येतो. आणि एकाचा व्यवहार दुसऱ्याच्या नावावर नाही होत इथे. "
सुहास ने ती बिले दाखवली आणि म्हणाला " हे बघा.. या दिवशी मॅडम इथे आल्या नव्हत्या हे अगदी शंभर टक्के खरे आहे. कारण ती माझ्याबरोबर होती. तरीही तिच्या नावावर ही उलाढाल कशी ?? "
देसाई सरांनी ती बिले पाहिली आणि म्हणाले." यावर मॅडम ची सही आहे. म्हणजे हे त्यांनीच केले असणार. नाहीतर बिले आली कशी ?"
सुमती : " नाही सर... मी या दोन दिवशी आलेच नव्हते."
हळूहळू तिचे डोळे भरून येऊ लागले. सुहासने तिला थोपटले आणि मी बोलतो म्हणाला.
देसाई सरांना तिच्या बोलण्यातून कळकळ सत्यता जाणवली. त्यांनी नोकराला हाक मारली आणि एक रजिस्टर घेवून यायला सांगितले.
सुमती खाडकन चमकली. अरेच्च्या मी हे रजिस्टर कसे विसरली. ???
देसाई सरांनी त्या दिवशीच्या नोंदी पाहिल्या. खरेच की मॅडम च्या सह्या नाहीत या दोन दिवशी.
सुहास सुमती ला दोन दिवसांनी भेटू असे सांगितले आणि परत पाठवले.
सुहास ला काही कळेना. असे का केले असावे त्यांनी. पण तो शांत राहिला. दोन दिवसांनी कळेलच हा विचार करून. दोघे घरी आले.
इकडे देसाई सरांनी लगेचच त्यादिवशी व्यवहार बघणारे जे होते त्यांना बोलावले. आणि ते ही चक्रावून गेले. त्यातून एक वेगळेच प्रकरण बाहेर आले. माझ्या इथे एवढा घोटाळा आणि मला समजले पण नाही. त्यांना खूप वाईट वाटले.
त्यांच्याकडे असा एक client होता जो हुशार होता आणि तिथे काम करणारा याला मिळालेला होता. हा client त्याचे नुकसान झाले तर तो ते व्यवहार नवीन client च्या नावे ट्रान्स्फर करायला सांगायचा आणि त्या बदल्यात काही रक्कम त्या माणसाला द्यायचा. आणि या सगळ्यात सुमती नवीन असल्याने सापडली होती.
देसाई सरांना आता सगळे दृश्य स्पष्ट झाले.
दोन दिवस संपले.
तिसऱ्या दिवशी पुन्हा सुहासने सुट्टी घेतली. दहा वाजता दोघेही तिथे हजर झाले.
देसाई सरांनी त्यांना जे खरे होते ते सांगितले आणि माफीही मागितली. योग्य ती कारवाई केल्याचे पण सांगितले.
पण पैश्याचे काय ??? ते तर भरावेच लागणार होते.
एक लाख पंचावन्न हजार...
सुहासने एक आठवड्याची मुदत मागून घेतली आणि सुमतीचे अकाउंट बंद करण्यास सांगितले. पण देसाई सरांनी व्यवहार पूर्ण झाल्याशिवाय अकाउंट बंद होणार नाही हे सांगितले आणि अकाउंट ब्लॉक केले. जेणेकरून आता त्यावर कोणताही व्यवहार होऊ शकणार नाही.
दोघेही घरी आले. सुमतीला पुन्हा पुन्हा रडू येत होते. माझ्यामुळे किती नुकसान. सुहास ही सुन्न बसून होता. मुदत तर घेतली मागून. पण पैसे कसे जमा करायचे ???
सुमती उठली आणि सगळे दागिने घेवून आली. सुहास समोर ठेवले आणि म्हणाली " चूक माझी आहे. शिक्षा मलाच व्हायला हवी. "
सुहासने तिला जवळ घेतले आणि म्हणाला " माझ्यावर विश्वास आहे ना ?? करतो मी काहीतरी. तू तुझे दागिने होते तिथे ठेव. "
दुसऱ्या दिवशी ऑफिस मध्ये जाताच त्याने तत्काळ लोन ची चौकशी केली. तीन दिवसात लोन मिळेल असे त्यास सांगण्यात आले पण व्याजाचा दर थोडा जास्त. त्याने किती रक्कम मिळेल याचीही चौकशी केली. आणि ते बघून दीड लाख साठी अर्ज केला. पाच हजार बचतीतून काढायचे ठरवले. मनावरचे ओझे थोडे कमी झाले या विचाराने त्याला बरे वाटले.
संध्याकाळी घरी आल्यावर त्याने सुमतीला सगळे सांगितले. तिला बरे ही वाटले आणि दुःख ही झाले. पण ती काहीच बोलली नाही.
चार दिवसांनी सुहास च्या अकाउंट ला लोन चे पैसे जमा झाले. ते पैसे त्याने सुमती च्या अकाउंट ला ट्रान्स्फर केले.
त्याच दिवशी दोघे परत देसाई सरांकडे आले. आणि सुमतीने त्यांच्यासमोर एक लाख पंचावन्न हजार चा चेक ठेवला.
देसाई सरांनी सर्व व्यवहार पूर्ण केला. सुमतीचे अकाउंट बंद केले. दोघे ही तिथून बाहेर पडले.
दोन दिवस गेले. सुमती शांत शांत होती. सुहास ने तिला सांगितले... जे झाले ते झाले. विसरून जा पण यापुढे जपून.
सुमती म्हणाली : " हं !!! मी यातून धडा घेतला खरा पण माझ्यासारखे किती असतील अजुन ?? "
सुमती पुन्हा असा वेडेपणा करणार नाही हा विचार करून सुहास त्याच्या कामाला लागला.
सुमती ने तिच्या छंदाचा व्यवसाय केला. दोन वर्षात खूप मेहनत घेतली आणि बऱ्यापैकी रक्कम जमवली. आणि ती रक्कम तिने सुहास का देऊ केली तर त्याने ती रक्कम तिलाच परत दिली. आणि म्हणाला : " मला माझी धडाडीची हसरी समाधानी सुमी हवी आहे. पैसे नको. तुझ्या कष्टाचे आहेत. राहू दे तुझ्याजवळच ."
दोन दिवस संपले..
सुमती ने पेपर बाजूला ठेवला आणि जाहिराती मधील त्या नंबर वर फोन केला.
" नमस्कार... मी मिसेस सुमती दिघे. मला तुमचा शेअर मार्केट चा कोर्स करायचा आहे. त्यासाठी नाव नोंदवायचे आहे."
तिच्या डोक्यातून शेअर मार्केट गेलेच नव्हते. तिने कोर्स पूर्ण केला.
नव्या जोमाने ती या क्षेत्रात उतरली. स्वतः पैसे न गुंतवता ती सल्ला देण्याचे काम करू लागली. आणि खूप अभ्यास करून ती कोणता शेअर घ्यायचा कधी विकायचा ते सांगू लागली. काही अडले की ती कोर्सच्या सरांना विचारायची. ते ही मदत करायचे. तिची धडाडी जिद्द पाहून त्यांनी तिला त्यांच्या कडेच काम ही दिले. ओळखी वाढल्या. नाव ही झाले.
जी रक्कम तिने घालवली होती ती सगळी परत मिळवली.
सहा दिवसात गेलेली रक्कम मिळवायला तिला तब्बल सहा वर्षे लागली.
सावंत च्या फोन मुळे तिच्या साऱ्या स्मृती जाग्या झाल्या.
आज जरी ती शास्त्रशुद्ध पद्धतीने सल्ला देत असली तरी काय करू नये हे ही सांगत असे. हे क्षेत्र खूप बेभरवशाचे आहे .. जास्त वाहवत जाऊ नका हे सांगायला ती कधी ही विसरत नाही.
Comments
Post a Comment